छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात 21 दिवसात पाच सहकारी साखर कारखान्यांनी केवळ 2 लाख 2 हजार 584 मेट्रिक टन उसाचे गाळप केल आहे. त्यातून एक लाख 56 हजार 65 किंवटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले असून सरासरी उतारा केवळ 7.45 टक्के आला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या शरद सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम 11 नोव्हेंबर रोजी सुरु झाला असून 22 नोव्हेंबरअखेर कारखान्याने 9655 टन उसाचे गाळप करून 3525 क़्विटल साखरेचे उत्पादन केले आहे. साखर उतारा मात्र 3.65 इतका अत्यल्प आहे.
कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2700 रुपये प्रति टनाप्रमाणे रक्कम जमा करण्यात आली आहे. त्याचबरोबर तोडणी वाहतूकदार यांचेही पैसे बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. शरद साखर कारखाना पैठण तालुक्यात सर्वात अगोदर ऊस बील देणारा कारखाना ठरला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी सुखावले आहेत. कारखाना व्यवस्थापन जास्तीत जास्त ऊस गाळप करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
जिल्ह्यात पैठण परिसरातील संत एकनाथ सहकारी-सचिन घायाळ शुगर, सिल्लोड तालुक्यातील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, पैठण तालुक्यातील विहामांडवा परिसरातील शरद सहकारी साखर कारखाना, कन्नड शहर परिसरातील बारामती अॅग्रो , छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील छत्रपती संभाजीराजे साखर कारखाना, गंगापूर तालुक्यातील शेंदूरवादा परिसरातील मुक्तेश्वर शुगर मिल आणि खुलताबाद तालुक्यात घृष्णेश्वर साखर कारखाना असे सात कारखाने आहेत. घृष्णेश्वर साखर कारखाना चालू होण्याची शक्यता कमी आहे.















