सहारनपूर : बिडवी आणि टोडरपूर साखर कारखाना चालवावा अशी मागणी भाजप शेतकरी मोर्चाचे प्रदेश मंत्री पद्मसिंह ढायकी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्याचे ऊस मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांच्याकडे केली. यावेळी शिष्टमंडळाने त्यांना निवेदन सादर केले. हे दोन्ही कारखाने बंद झाल्याने कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, लखनौमध्ये ऊसमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळाने सांगितले की, जिल्ह्यात आठ साखर कारखाने आहेत. त्यापैकी फक्त सहा कारखाने सुरू आहेत. तर दोन कारखाने गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहेत. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उसाचे उत्पादन घेतले जाते. जिल्ह्यात दरवर्षी उसाचे लागवड क्षेत्रही वाढत आहे. यावर्षीही ऊस क्षेत्र तीन ते चार टक्क्यांनी वाढले आहे. अशाच जिल्ह्यात जर आठ कारखाने सुरू असतील तर गळीत हंगाम वेळेवर पूर्ण होऊ शकतो. यंदा जिल्ह्यातील दोन कारखान्यांचा हंगाम मे महिन्यापर्यंत सुरू ठेवावा लागला होता. त्यामुळे शेतातील लागण पिकाची तोडणी उशीरा होते आणि खोडवा पिकाला मोठा फटका बसतो. शेतकऱ्यांनी अनेकदा कारखाने सुरू करण्याची मागणी केली आहे असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी मनोज पुंडीर, अजय प्रधान, सुभाष चौधरी, सुशील कुमार आदी उपस्थित होते.