सलग चौथ्या दिवशी इंधन दरवाढ

121

नवी दिल्ली : अमेरिकेच्या कारवाईत इराणचा लष्करप्रमुख मारला गेल्याने मध्य पूर्वेवरील युद्धाचे ढग गडद झाले आहेत. त्याचा परिणाम सलग चौथ्या दिवशी इंधन दरवाढ होण्यात झाला आहे. त्यामुळे पेट्रोल दर 9 पैशांनी, तर डिझेलची किंमत 11 पैशांनी वाढली. त्यामुळे पेट्रोलची किंमत दिल्लीत 75 रुपये 54 पैसे, तर डिझेलची किंमत 68 रुपये 51 पैशांवर पोहोचली. जागतिक बाजारपेठेत याचे परिणाम अधिक तीव्र झाले असून कच्च्या तेलाची किंमत तीन टक्कयांनी वाढली.

कासीम सुलेमानी यांच्या हत्येने भौगोलिक राजकीय संघर्षाची भीती वाढली आहे. त्यामुळे इराण आणि अमेरिकेत संघर्ष होण्याची दाट शक्यता आहे. त्याचा परिणाम इराण आणि अमेरिकेच्या थेट युद्धात होंवू शकतो, असे भाकित ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सने वर्तवले आहे.

भारतातील इंधनापैकी 84 टक्के इंधन आयात केले जाते. एवढेच नव्हे तर भारतात उत्पादित होणार्‍या कच्च्या तेलाचे दरही आंतरराष्ट्रीय दराप्रमाणेच असतात. मध्य पूर्वेतून होणार्‍या तेल पुरवठ्यापैकी दोन तृतियांश पुरवठा हा सौदी अरेबिया आणि इराकमधून होतो. भारताला होणार्‍या तेल पुरवठ्यात तातडीने कोणतीही कपात होण्याची शक्यता नसली तरी त्याचा दरवाढीवर परिणाम होणार आहे.

सहा वर्षात सर्वात कमी विकासदर म्हणजे 4.5 टक्के असताना देशाला वाढणार्‍या इंधन किंमतीचा मोठा फटका बसण्याचा धोका आहे. त्यामुळे केवळ चलनवाढच होणार आहे असे नव्हे तर सरकारला या इंधनावरील अनुदानही वाढवावे लागणार आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here