बारामती: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची गुरुवारी बिनविरोध निवड करण्यात आली. माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी १२ मार्च रोजी विशेष निवडणूक प्रक्रिया पार पडली. बारामतीचे प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी या निवडीची अधिकृत घोषणा केली. कारखान्याच्या मुख्य कार्यालयात संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे ही निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.
कारखान्याच्या अध्यक्षपदाची निवडणूक यापूर्वी १ मार्च रोजी होणार होती. मात्र, तत्कालीन तांत्रिक कारणांमुळे आणि निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांच्या अनुपस्थितीमुळे ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. माळेगाव कारखान्याच्या कारभारात सातत्य राहावे आणि आधुनिकीकरणाच्या प्रकल्पांना वेग मिळावा, यासाठी सुनेत्रा पवार यांनीच धुरा सांभाळावी, असा आग्रह संचालक मंडळातील सदस्यांनी धरला होता. संचालकांच्या या विनंतीला मान देऊन त्यांनी ही जबाबदारी स्वीकारण्यास संमती दर्शवली.

















