पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने कोट्यवधी रुपये खर्च करून विस्तारवाढ केली. कारखान्याने चालू गळीत हंगामात १० मार्चपर्यंत सुमारे १२ लाख ११ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. फेब्रुवारीत येणाऱ्या उसाला १००, मार्च महिन्यात २०० आणि एप्रिलमधील उसाला ३०० रुपये टन अनुदान जाहीर केले होते. मात्र, मार्चच्या तिसऱ्या आठवड्यातच कारखाना बंद होणार असल्याने एप्रिल महिन्यातील अनुदान कोणाला मिळणार, असा सवाल शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी केला. कारखान्याचे अध्यक्ष उसाच्या गाळपाबाबत व अनुदानाबाबत पोकळ घोषणा करून सभासदांची दिशाभूल करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
राज्यात साखर, रिकव्हरी आणि अल्कोहोल विक्रीतून कारखान्यांना फायदा होत आहे. मात्र, प्रसिद्धीसाठी अनुदानाची घोषणा करून सभासदांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप सतीश काकडे यांनी केला. फेब्रुवारीमध्ये सभासदांचा २ लाख ६३ हजार टन ऊस गाळपासाठी आला. १०० रुपये प्रतीटन याप्रमाणे सुमारे २ कोटी ६३ लाख रुपये अतिरिक्त मिळाले. मात्र, तोडणी वाहतूकदारांकडून प्रति एकर ४ ते ८ हजार रुपये घेतले. मार्च महिन्यात आतापर्यंत सुमारे ६५ हजार टन उसाचे गाळप झाले आहे. उसासाठी २०० रुपये प्रमाणे १ कोटी ३० लाख रुपये अतिरिक्त मिळाले आहेत. परंतु तोडणीसाठी ५ ते १० हजार रुपये खर्च करावे लागत आहेत हे काकडे यांनी निदर्शनास आणून दिले. संचालक मंडळाने फेब्रुवारी व मार्चमध्ये गाळपास आलेल्या उसाचे तोडणी वाहतूकदारांनी घेतलेली रक्कम त्यांच्याकडून वसूल करून शेतकऱ्यांना देण्यात यावी. तसेच फेब्रुवारीपासून गाळपास आलेल्या उसास २०० रुपये व मार्च महिन्यामध्ये गाळपास येणाऱ्या उसास ३०० रुपये अनुदान देण्याची मागणी काकडे यांनी केली आहे.


















