बहुमत चाचणीपूर्वीच उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, विधान परिषद सदस्यत्वही सोडले

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदाचा उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आहे. राज्यातील जनतेशी संवाद साधताना त्यांनी याची घोषणा केली. यावेळी ठाकरे म्हणाले की, माझ्याकडे जी शिवसेना आहे, ती कोणीही काढून घेऊ शकत नाही. मी विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा देत आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यातील जनतेशी संवाद साधताना आपल्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख केला. आमच्या चांगल्या कारभाराला दृष्ट लागली. आम्ही शहरांच्या नामकरणाचाही निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी आणि शरद पवार यांचे कौतुक केले.

एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, उद्धव ठाकरे म्हणाले की, कोर्टाने निर्णय दिला आहे. बहुमत चाचणी घेण्यास सांगितले आहे. राज्यपालांचेही मी आभार मानतो. लोकशाहीचे पालन झाले पाहिजे. आम्ही त्याचे पालन करतो. बंडखोरांवर टीका करताना ते म्हणाले की, त्यांनी समोर येवून चर्चा करायला हवी होती, सूरत अथवा गुवाहटीमधून नाही. ज्यांना सर्व काही दिले ते नाराज राहिले.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेट बैठकीतच आपल्या राजीनाम्याचे संकेत दिले होते. बैठक संपल्यानंतर त्यांनी मला अडीच वर्षे दिलेल्या सहकार्याबद्दल आभारी आहे. जर अडीच वर्षात माझ्याकडून काही चुकले असेल तर मी माफी मागतो असेही ते म्हणाले. बंडखोरांवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, अनेक लोकांनी मला दगा दिला. मंत्रालयात पोहोचल्यावर मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संविधानाचे निर्माते बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. बैठकीतही आपल्या सहकाऱ्यांना धन्यवाद दिल्यानंतर ते मुख्यमंत्री कार्यालयात पोहोचले. त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयातील स्टाफला बोलावून त्यांचेही आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here