सांगली : ऊस खरेदीची किमान आधारभूत किंमत विरुद्ध साखरेचा किमान विक्रीदर यात तफावत वाढत आहे. साखर कारखान्यांना शेतकऱ्यांना देणे बंधनकारक असलेली उसाची किमान किंमत आणि त्यांना साखर विकण्याची परवानगी असलेली किंमत किमान दर यातील दरी वाढत आहे. साखरेचा उत्पादन खर्च प्रतिक्विंटल ४ हजार १६६ इतका अंदाजित आहे. मात्र, विक्री दर अवघा ३१०० रुपये आहे. ही तफावत दूर करून साखरेची एमएसपी आणि इथेनॉलच्या किमतीमध्ये तातडीने वाढ करणे गरजेचे आहे असे मत विश्वासराव नाईक कारखान्याचे कार्यकारी संचालक अमोल पाटील यांनी व्यक्त केले.
कार्यकारी संचाक पाटील म्हणाले की, अनेकदा उसाच्या रास्त किंमत वाढवूनही, साखरेची किमान विक्री किंमत आणि इथेनॉलच्या किमतीमध्ये प्रमाणबद्ध वाढ न होणे हे टिकाऊ नाही. तातडीने सुधारणात्मक उपाययोजना केल्या नाहीत, तर आगामी हंगामात अनेक साखर कारखान्यांचे कामकाज ठप्प होईल. केंद्र सरकारने ३० एप्रिल रोजी जाहीर केलेल्या निर्णयात, आगामी गळीत हंगामासाठी उसाची एफआरपी ३४० वरून ३५५ रुपये प्रतीक्विंटल केली. या निर्णयामुळे उसाला चांगला दर मिळणार आहे. मात्र, २०१९ पासून एमएसपी वाढलेली नाही. साखरेचा दर ३१०० रुपयांवर स्थिर आहे. त्यामुळे सहकारी आणि खासगी कारखान्यांवर प्रचंड आर्थिक ताण आहे. हे चित्र बदलण्याची गरज आहे.