लातूर : लातूर येथील मांजरा समूहाला सीएनएच या कृषी व बांधकाम उपकरणांच्या क्षेत्रातील जगप्रसिद्ध कंपनीने ११७ केएसआयएच ऊसतोडणी यंत्रे व २३४ न्यू हॉलंड ट्रॅक्टर वितरित केली आहेत. कंपनीने प्रथमच एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर, ऊस तोडणी यंत्रे वितरित केली. ‘सीएनएच’चे मुख्य कार्यकारी अधिकारी गेरिट मार्क्स यांच्या उपस्थितीत हा वितरण सोहळा पार पडला. यावेळी ‘सीएनएच इंडिया’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नरेंद्र मित्तल म्हणाले, “भारतातील यांत्रिकीकरणाच्या प्रवासाला वेग देण्यासाठी देशमुख समूहासोबत भागीदारी करण्याची संधी आम्हाला मिळाली, याचा अभिमान वाटतो. आमच्या ग्राहकांच्या गरजेनुसार विश्वासार्ह, सक्षम आणि उच्च कार्यक्षमता उपाय पुरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.”
यावेळी मांजरा समूहाचे संचालक, माजी आमदार धीरज देशमुख म्हणाले की, गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ आम्ही सीएनएचची उपकरणे वापरत आहोत. यंत्रसामग्रीचा विस्तार किंवा नूतनीकरणाचा विचार करताना ‘सीएनएच’ हाच आमचा पहिला पर्याय असतो. नव्या यंत्रांमुळे आमचे कामकाज अधिक सक्षम होईल आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी व ऊस उद्योगासाठी अधिक मूल्य निर्मिती घडेल, याची आम्हाला खात्री आहे. दरम्यान, ‘सीएनएच’ने भारतामध्ये ऊसतोडणी यंत्रे आणणारी अग्रगण्य कंपनी म्हणून या क्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. कामगार टंचाईचा प्रश्न सोडवणे, शेतीतील कार्यक्षमता वाढवणे आणि वेळेवर तोडणी सुनिश्चित करणे यासाठी ‘सीएनएच’च्या उपाययोजना महत्त्वपूर्ण ठरत आहेत.