नवी दिल्ली : समाधानकारक पावसामुळे आगामी हंगामात साखरेचे एकूण उत्पादन ३४९ लाख मेट्रिक टनावर पोहोचेल, असा प्राथमिक अंदाज ‘इस्मा’ने वर्तवला आहे. गळीत हंगाम सुरु होण्यापूर्वी तीन महिने अगोदर उपग्रहाद्वारे छायाचित्रे घेऊन उत्पादनाचा अंदाज बांधण्याची पद्धत आहे. यानुसार गत हंगामापूर्वी देशात ५७ लाख १० हजार हेक्टरवर ऊस गाळपासाठी उपलब्ध होता. नुकत्याच घेतलेल्या छायाचित्रामध्ये हे लागवड क्षेत्र ५७ लाख २० हजार हेक्टरवर गेले आहे. त्यामध्ये महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांतील लागवड क्षेत्र गतवर्षीच्या तुलनेने अनुक्रमे ८ व ६ टक्क्यांनी वाढले आहे असे दिसून आले आहे.
गेल्या हंगामात देशांतर्गत साखरेचा वापर २९१ लाख मेट्रिक टनावर गेला होता. त्यामुळे देशांतर्गत गरज भागविण्यासाठी हंगामपूर्व शिल्लक साठ्याचा वापर करणे अनिवार्य झाले. यंदा केंद्राच्या धोरणाला अनुसरून ५० लाख टन साखर इथेनॉल निर्मितीकडे वळली, तरी बाजारात ३०० लाख टन साखर वापरासाठी उपलब्ध होऊ शकते. २०२५-२६ या साखर वर्षात देशांतर्गत साखरेचा वापर २७९ लाख टन अपेक्षित असल्याने यंदा देशांतर्गत गरज भागविण्यासाठी शिल्लक साठ्याचा वापर करण्याची वेळ येणार नाही. गेल्या दोन वर्षांपासून देशातील साखर उत्पादनात घसरण नोंदविली गेली. मात्र आगामी गळीत हंगामात साखर उत्पादनाचा आलेख उंचावण्याचे संकेत मिळाले आहेत. महाराष्ट्र व कर्नाटक या दोन प्रमुख राज्यांच्या उपग्रहाच्या छायाचित्राच्या आधारे आगामी हंगामात गाळपासाठी अनुक्रमे १४ लाख ९० हजार हेक्टर व ६लाख ७० हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस उभा आहे. याउलट गतवर्षी आघाडीवर असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये मात्र लागवड क्षेत्र ३ टक्क्यांनी घसरले आहे.