रामपूर : राज्यमंत्री बलदेव सिंह औलख यांच्या आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंगळवारी शेतकऱ्यांना ऊस थकबाकीपोटी धनादेशाचे वितरण करण्यात आले. शासनाने तालुक्यातील शेतकऱ्यांना ३७ कोटी रुपयांचे वितरण केल्याची माहिती राज्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
नैनिताल हायवेस्थित हॉटेल अमरदीपमध्ये रुद्र-विलास साखर कारखान्याच्यावतीने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यामध्ये शेतकऱ्यांसह अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात राज्यमंत्री औलख म्हणाले, शेतकऱ्यांच्या सर्व प्रकारच्या गरजा भागविण्यासाठी आणि अडचणी सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक निकड लक्षात घेऊन वेळेवर ऊस बिले मिळावीत असे प्रयत्न आहेत. शासनाकडून साखर कारखान्यांवर नियंत्रण ठेवले जात आहे. ऊस बिले देण्यात टाळाटाळ होऊ नये याची दक्षता घेतली आहे.
मंत्र्यांनी सांगितले की, रुद्र-विलास साखर कारखान्याच्या ४०५९ शेतकऱ्यांपैकी ३८५४ शेतकऱ्यांना ऊस बिले देण्यात आली आहेत. उर्वरीत २०५ शेतकऱ्यांनाही लवकरच पैसे मिळतील. जिल्हाधिकारी रविंद्र कुमार मांदड यांनी सांगितले की, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकाचे पैसे वेळेवर देण्यास प्राधान्य दिले आहे. सध्या गव्हाची खरेदी प्रक्रीयाही सुरू आहे. यावेळी शेतकऱ्यांना दिलेले धनादेश तत्काळ बँकांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया करण्यात आली. कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक राजेश गुप्ता यांनी राज्यमंत्री तसेच जिल्हाधिकाऱ्यांचा स्मृती चिन्ह देऊन सन्मान केला. यावेळी जिल्हा ऊस अधिकारी हेमराज सिंह, उप जिल्हाधिकारी डॉ. राजेश कुमार, भाजप जिल्हा उपाध्यक्ष चित्रक मित्तल, रवि यादव, चेतन पारुथी, जे. सी. पाठक, त्रिलोकी सिंह, आंशिक सक्सेना, डी. सी. अग्रवाल, अभिनव यादव आदी उपस्थित होते.


















