देशात ५१ टक्के इथेनॉलची मक्क्यापासूनच निर्मिती, उसाचा वाटा ३१ टक्क्यांचाच

कोल्हापूर : ऑल इंडिया डिस्टिलर असोसिएशनने (एआयडीए) दिलेल्या माहितीनुसार, यंदा देशात आतापर्यंत १०३९ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा झाला असून, करारबद्ध १,१६३ कोटी लिटरच्या तुलनेत ८९ टक्के पूर्तता साध्य झाली आहे. यामध्ये धान्यआधारित स्रोतांकडून ७१८ कोटी लिटर, तर ऊस आधारित स्रोतांकडून ३२१ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा झाला आहे. इथेनॉल पुरवठा वर्ष २०२४-२५ मध्ये मक्याने इथेनॉल निर्मितीत निर्विवाद आघाडी घेतली आहे. धान्याआधारित इथेनॉल मध्ये तब्बल ५१ टक्के इथेनॉल हे केवळ मक्यापासून तयार झाले. साखर उद्योगाला मक्याने मागे टाकले आहे. गेल्या काही वर्षात इथेनॉल उत्पादन हे साखर कारखाना व ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अप्रत्यक्ष उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन ठरले होते. मात्र साखर उद्योगातून तयार होणाऱ्या इथेनॉलला दर कमी मिळत असल्याने साखर उद्योगातून मात्र नाराजी आहे.

देशातील इथेनॉल उद्योगाची एकूण उत्पादन क्षमता आता सुमारे २००० कोटी लिटरपर्यंत पोहोचली असून, ३८० हून अधिक डिस्टिलरी कार्यरत आहेत. आणखी ३३ प्रकल्प उभारणीच्या टप्प्यात आहेत. भारताने २०२५ मध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण उद्दिष्ट आधीच गाठल्याचे संघटनेने म्हटले आहे. एआयडीएने दिलेल्या माहितीनुसार, या वर्षात धान्य आधारित कच्च्या मालाचा वाटा ७१८ कोटी लिटर होता, जो एकूण इथेनॉल निर्मितीच्या जवळपास ६९ टक्के इतका होता. ऊस आधारित कच्च्या मालाचा वाटा ३२१ कोटी लिटर म्हणजे ३१ टक्के होता. सरकारी धोरणे, तसेच मक्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलसाठी ७१.८६ रुपये प्रति लिटर दरामुळे मक्यावर आधारित उत्पादनात मोठी वाढ झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here