देशात ईएसवाय २०२४-२५ मध्ये जूनपर्यंत ६६१ कोटी लिटर इथेनॉलचे केले मिश्रण

नवी दिल्ली : भारत आपल्या इथेनॉल मिश्रित पेट्रोल (ईबीपी) कार्यक्रमात सातत्याने प्रगती करत आहे. त्यामुळे इथेनॉल उत्पादन आणि मिश्रण पातळी दोन्हीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. चालू इथेनॉल पुरवठा वर्ष (ईएसवाय) २०२४-२५ दरम्यान, जून २०२५ मध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण १९.९ टक्यापर्यंत पोहोचले. पेट्रोलियम नियोजन आणि विश्लेषण कक्ष (पीपीएसी)च्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर २०२४ ते जून २०२५ पर्यंत एकत्रित सरासरी मिश्रण दर १८.९ टक्के होता.

तेल विपणन कंपन्यांना (ओएमसी) ईबीपी कार्यक्रमांतर्गत जून २०२५ मध्येच, ८७.५ कोटी लिटर इथेनॉल मिळाले. त्यामुळे नोव्हेंबर-जून या कालावधीत ओएमसींकडून इथेनॉलचा एकूण वापर ६३७.४ कोटी लिटर झाला. अधिकृत आकडेवारीनुसार जून २०२५ मध्ये पेट्रोलमध्ये एकूण ८८.९ कोटी लिटर इथेनॉल मिसळण्यात आले. त्यामुळे नोव्हेंबर २०२४ ते जून २०२५ पर्यंत एकूण इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण ६६१.१ कोटी लिटर झाले.

सरकारने २०२५-२६ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ईबीपी कार्यक्रम सुरू झाल्यापासून, २०१३-१४ च्या ईएसवायमध्ये इथेनॉल मिश्रण ३८ कोटी लिटरवरून २०२३-२४ मध्ये ७०७.४ कोटी लिटरपेक्षा जास्त झाले आहे. या विस्तारामुळे भारताला २०२३-२४ च्या ईएसवाय दरम्यान सरासरी १४.६ टक्के इथेनॉल मिश्रण दर साध्य करण्यास मदत झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here