कारखाना कर्मचाऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन

लखिमपूर : शारदा साखर कारखाना कामगार संघ आणि शारदा वर्क्स असोसिएशनच्या कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांबाबत कारखान्याच्या परिसरात बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन थांबविले जाणार नाही असा इशारा कामगार संघटनांच्या नेत्यांनी दिला. मंगळवारी आंदोलनस्थळी आलेले समाजवादी पक्षाचे नेते नरेश यादव यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना आपला पाठिंबा दिला.

शारदा साखर कारखाना कामगार संघ आणि शारदा वर्क्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला निवेदन देऊन आपल्या मागण्या मांडल्या होत्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. कारखाना प्रशासन कारणे देऊन टाळाटाळ करीत असल्याचा आरोप कामगारांचा आहे. मागण्या पूर्ण करण्यासाठी एक मार्चपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन न थांबविण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांचा आहे. कामगार नेते निर्भय नारायण सिंह, सलीम अंसारी, कमलेश राय, सिराजुद्दीन चंद्रिका प्रसाद यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here