अलीगड : भारतात ऐंशी टक्के छोटे शेतकरी आहेत. त्यांना मदत करण्यासाठी आमच्या सरकारने अनेक पावले उचलली आहेत असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. उत्तर प्रदेश डिफेंस कॉरिडोरअंतर्गत राजा महेंद्र प्रताप राज्य विद्यापीठ आणि अलीगड नोडच्या कोनशीला समारंभानंतर आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. शेतकऱ्यांना मदतीसाठी किसान सन्मान निधीचाही शेतकऱ्यांच्या मदतीत समावेश आहे. त्याशिवाय एमएसपी देण्याबाबती आम्ही पावले उचलली आहेत असे पंतप्रधान म्हणाले.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांबाबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ऊस खरेदी करण्याच्या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करण्याबाबत सातत्याने काम केले जात आहे. गेल्या चार वर्षामध्ये उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १,४०,००० कोटी रुपयांहून अधिक रक्कमेची ऊस बिले देण्यात आली आहेत. आगामी काळात उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी नव्या पर्यायांची दारे उघडणार आहेत. उसापासून इथेनॉल उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.














