बिजनौर : केंद्र सरकारने लागू केलेले कृषी कायदे मागे घ्यावेत आणि ऊस दरासह विविध मागण्यांचे निवेदन भारतीय किसान युनियनच्या भानू गटाने उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले. तहसील कार्यालय परिसरात पोहोचलेल्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेल्या या निवेदनातून विविध मागण्या मांडल्या.
भारतीय किसान युनियनच्या भानू गटाच्या विभाग प्रभारी राजेंद्र सिंह, विभाग अध्यक्ष दीपक सैनी, राजपाल सिंह, विपिन कुमार, ठाकुर अमरदीप, चौ. नंदराम यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेल्या शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात पोहोचून मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन उपजिल्हाधिकारी मनोज कुमार सिंह यांना दिले. यामध्ये शेतकऱ्यांनी कृषी कायदे त्वरीत मागे घेण्याची मागणी केली. चालू गळीत हंगामात खरेदी केलेल्या उसाला ५०० रुपये प्रती क्विंटल दर द्यावा, कोविड १९मुळे शेतकऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक फी रद्द करावी, शेतकऱ्याचा अचानक मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी आदी मागण्या मांडण्यात आल्या. ओव्हरलोड वाहतूक रोखावी, ऊस वाहतुकीदरम्यान खड्डेमुक्त रस्ते असावेत या बाबतही विचार करावा अशी मागणी करण्यात आली. निवदन देणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये अतर सिंह, विजय शंकर पांडेय, धूम सिंह, अंकित कुमार, सुरेखा देवी यांसह अनेक शेतकरी सहभागी होते.











