महाराष्ट्रातील प्रख्यात समाजसेविका, पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी पुण्यातील गॅलक्सी केअर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. गेल्या महिनाभरापासून सिंधुताई यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मंगळवारी रात्री ८.१० वाजता हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
अनाथांच्या माय अशी सिंधुताई सपकाळ यांची ओळख होती. अनाथ मुलांसाठी समाजसेवा करणाऱ्या त्या कार्यकर्त्या होत्या. आपल्या स्वतःच्या जीवनात अडचणी असूनही त्यांनी अनाथ मुलांना सांभाळण्याचे काम केले. त्यांनी हजारो अनाथ मुलांना आईची माया दिली. परिस्थितीमुळे स्वतःचे शिक्षण पूर्ण करू न शकणाऱ्या सिंधुताईंनी मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी अविरत कष्ट केले. बालसदन या संस्थेची स्थापना करून त्यांच्या माध्यमातून त्या कार्यरत राहिल्या.













