नवी दिल्ली : देशातील जनतेला महागाईच्या आघाडीवर एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. सरकारला प्रयत्नानंतरही महागाई रोखण्यात अपयश आलेले आहे. गेल्या काही दिवसांत किरकोळ महागाई दर ८ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला. आता घाऊक महागाईतही गतीने वाढ झाली आहे. सरकारने मंगळवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल महिन्यात घाऊक महागाईचा दर १५.०८ टक्के अशा उच्च स्तरावर राहीला. त्याआधीच्या मार्च महिन्यात हा दर १४.५५ टक्क्यांवर होता. नऊ वर्षात घाऊक महागाईच्या दराची ही उच्च स्थिती आहे.
याबाबत दैनिक अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सलग तेराव्या महिन्यात घाऊक महागाई उच्चांकी स्तरावर आहे. गेल्या वर्षी समान कालावधीत घाऊक महागाईचा दर १०.७४ टक्के होता. गेल्यावर्षी एप्रिलपासून सलग १३ व्या महिन्यात हा दर दोन अंकी झाला. याबाबत वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने म्हटले आहे की, एप्रिल २०२२ मध्ये खनिज तेल, मूळ धातू, कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस, खाद्यपदार्थ, खाद्य उत्पादने, रसायने तसेच रासायनिक उत्पादनांच्या किमतीत वाढीमुळे घाऊक महागाईचा दर वाढला आहे. सरकारी आकडेवारीनुसार खाद्यपदार्थांच्या महागाईचा दर ८.३५ टक्के आहे. भाजीपाला, गहू, फळे, बटाट्याच्या किमतीत गतीने वाढ झाली. याशिवाय इंधन आणि विजेच्या महागाईचा दर ३८.६६ टक्के आहे. कच्चे पेट्रोलियम पदार्थ आणि नैसर्गिक गॅसच्या महागाईचा दर एप्रिल महिन्यांत ६९.०७ टक्क्यांवर गेला आहे.












