नवी दिल्ली : मंदीच्या शक्यतेदरम्यान ब्रेंट क्रूड (कच्चे तेल) १०० डॉलर प्रती बॅरलवर आले आहेत. देश आणि जगातील मंदीच्या शक्यतेमुळे मागणीत प्रचंड घसरण झाली आहे. त्यामुळे कच्चे तेलाचे दर आधीपेक्षा खालच्या स्तरावर आले आहेत. काही रिपोर्टनुसार रशिया-युक्रेन युद्ध आणि जागतिक परिस्थिती यामुळे कच्च्या तेलाच्या दरात खूप मोठी वाढ होण्याची शक्यता होती. मात्र, ही शक्यता हळूहळू कमी होत जाताना दिसत आहे. पुढील एक वर्षात जगातील अनेक बड्या महाशक्ती आणि विकासशील देश मंदीच्या फेऱ्यात अडकू शकतात. त्यामुळे कच्च्या तेलाची मागणी कमी होताना दिसून येत आहे. मागणी घसरल्याने प्रती बॅरल कच्च्या तेलाचा दर १०० डॉलरपेक्षा कमी आला. एएफपी वृत्तसंस्थेने याची माहिती दिली आहे.
याबाबत टीव्ही९हिंदीमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, एएफपीने म्हटले आहे की, बुधवारी जगभरात कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली. मंदीच्या शक्यतेने दर घसरत आहेत. मागणी खालावत चालल्याचे दिसून येत आहे. ब्रेंट क्रूडचे दर १०० डॉलर प्रती बॅरलपेक्षा कमी झाले. युरोपचे बेंचमार्क क्रूड काँट्रॅक्ट, ब्रेंट नॉर्थ सीमध्ये ३.३ टक्के घसरण झाली. अमेरिकन बेंचमार्क डब्ल्यूटीआयमध्ये ३.३ टक्के घसरण होवून हा दर ९६.१२ डॉलरवर पोहोचला. सर्व बेंचमार्कमध्ये पाच टक्क्यांची घसरण दिसून आल्याचे एएफपीच्या वृत्तात म्हटले आहे. २५ एप्रिलनंतर पहिल्यांदाच दरात इतकी घसरण दिसली असून अमेरिका, जपान, युके, दक्षिण कोरिया, जर्मनी या देशातील संभाव्य मंदी हेच याचे कारण असल्याचे म्हटले जात आहे.












