नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी, एक ऑक्टोबर रोजी दिल्लीतील प्रगती मैदानात, सुरू झालेल्या इंडियन मोबाईल काँग्रेसमध्ये ५ जी इंटरनेट सेवा लाँच केली. दीर्घ काळापासून या ५ जी सेवेची प्रतीक्षा होती. मोबाईल उत्पादक कंपन्या खूप आधीपासून ५ जी स्मार्टफोन बाजारात उतरण्यास उत्सुक होते. सध्या देशातील काही निवडक बड्या शहरांत ५ जी सेवेचा लाभ मिळेल. यामध्ये दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, लखनौ, गुरुग्राम, चंडीगढ, अहमदाबाद, गांधीनगर, जामनगर बेंगळुरू, हैदराबाद आणि पुण्याचा समावेश आहे.
एबीपी लाइव्हने दिलेल्या वृत्तानुसार, ५ जी प्लानचे दर किती असतील, याचा तपशील अद्याप जारी झालेला नाही. ५ जी सर्व्हिस इंटरनेटचा स्पीड वाढवणार आहे. त्यामुळे या माध्यमातून होणाऱ्या वस्तू विक्री सेवेला याचा लाभ होईल. यास इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) म्हटले जाते. यामध्ये अनेक मशीनरी, उपकरणे समाविष्ट आहेत. भारतात १९९५ मध्ये २ जी सर्व्हिस लाँच करण्यात आली होती. त्यानंतर १४ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर २००९ मध्ये ३ जी सर्व्हिस लाँच झाली होती. २०१२ मध्ये ४ जी सर्व्हिस सुरू करण्यात आली. आणि आता २०२२ मध्ये ५ जी सर्व्हिस सुरू झाली आहे. जगभरातील अनेक देशांत ही सर्व्हिस खूप आधीपासून सुरू आहे. भारताला २ जी ते ५ जी पर्यंतच्या प्रवासाला २७ वर्षे तर ४ जी ते ५ जी या प्रवासाला १० वर्षे लागली आहेत. सद्यस्थितीत देशातील ५ जी टेलिकॉम स्पेक्ट्रमचा निम्मा हिस्सा जीओकडे आहे.













