नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी इथेनॉलच्या दरातील सुधारणा करण्याच्या कॅबिनेटच्या निर्णयाचे कौतुक करताना सांगितले की, यामुळे साखर उद्योगाशी संलग्न लोकांसह देशातील मेहनती ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल. केंद्रीय मंत्रिमंडळाने २ नोव्हेंबर रोजी इथेनॉल मिश्रीत पेट्रोल (ईपीबी) कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील इंधन वितरण कंपन्यांद्वारे (ओएमसी) डिस्टिलरीजकडून खरेदी केलेल्या इथेनॉलच्या दरवाढीस मंजुरी दिली आहे. आर्थिक व्यवहारांच्या मंत्रिमंडळ समितीने आगामी हंगाम २०२२-२३ साठी एक डिसेंबर २०२२ ते ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत ईपीबी कार्यक्रमांतर्गत ऊसावर आधारित विविध प्रकारच्या कच्च्या मालापासून मिळणाऱ्या इथेनॉलच्या दरास मंजुरी मिळाली आहे.
सरकारने सांगितले की, सी हेवी मोलॅसीसपासून इथेनॉलची किंमत ४६.६६ रुपयांवरून वाढवून ४९.४१ रुपये प्रती लिटर करण्यात येईल. बी हेवी मोलॅसीसपासून मिळणारे इथेनॉल एक डिसेंबरपासून ६०.७३ रुपये प्रती लिटर दराने घेतले जाईल. सद्यस्थितीत याचा दर ५९.०८ रुपये प्रती लिटर आहे. निवेदनात म्हटले आहे की, उसाचा रस, साखर, शुगर सिरप यापासूनच्या इथेनॉलचा दर ६३.४५ रुपयांवरून वाढवून ६५.६१ रुपये प्रती लिटर करण्यात येईल.
केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितले की, मोदी सरकारच्या दूरदर्शी उपायांमुळे आम्ही २०१४ मधील इथेनॉल मिश्रणाला १.४ टक्क्यांवरून वाढवून २०२२ मध्ये १० टक्के करण्यास सक्षम बनलो आहोत. त्यामुळे या आर्थिक वर्षात ४०,००० कोटींहून अधिक रुपयांच्या परकीय चलनाची बचत झाली आहे.












