बेंगळुरू : राज्यातील अनेक साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांनी पुरवठा केलेल्या उसाच्या वजनात हेराफेरी केली त्यानंतर राज्य सरकारने कारखान्यांवर छापे टाकले आहेत असे वृत्त दि इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित झाले आहे. या वृत्तानुसार, अशा तक्रारी आल्यानंतर राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी २१ कारखान्यांवर छापे टाकले.
राज्य सरकारने पहिल्यांदाच साखर कारखान्यांवर एवढ्या मोठ्या प्रमाणात छापे टाकले आहेत. साखर, अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक व्यवहार विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी संयुक्तरित्या सहा जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे टाकले. बेंगळुरूहून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या मोहिमेचे समन्वय केले. कर्नाटक ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष कुरबुर शांता कुमार यांनी सांगितले की, हेराफेरी केली जात असल्याच्या तक्रारीनंतर छापे टाकण्यात आले आहे. जर एखादा शेतकरी १५ टन ऊस घेवून आला तर तो १४ टन असल्याचे सांगून फसवणूक केली जाते असा आरोप त्यांनी केला.














