खटीमा : उधमसिंह नगरमध्ये ऊसाचे लागवड क्षेत्र २०२२-२३ या हंगामात नऊ टक्के वाढल्याने आनंदीत झालेल्या ऊस विकास विभागाने डोंगराळ भागातही ऊस शेती करण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी पिथौरागढच्या दुर्गम गावांची निवड करून शेतकऱ्यांना बियाणे देण्यात येत आहे. सरकारच्या मदतीने डोंगराळ भागातही गूळ उत्पादनाला प्रोत्साहन दिले जात आहे. कुमाऊंनंतर गढवालच्या चमोली जिल्ह्यातही या पायलट प्रोजेक्टवरही काम केले जात आहे. चमोलीच्या सीडीओंनी चर्चा करून योजना तयार केली आहे.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊस विकास तथा साखर उद्योग विभागाचे आयुक्त हंसा दत्त पांडे यांच्या निर्देशानुसार ऊस विकास विभागाने राज्यातील पिथोरागढ जिल्ह्यातील डुंडा, सन, समतरा, पाली, समिथुल, कनालीछीना, मुवानी, पैय्यापोरी, पंचोली, समती, डुंगी, भंडारगाव, आठखेत, रकना बिन, सांगरी, मिर्थी, भल्या, थरकोट, बलबीर, हडखोला, मलन, मुनस्यारी आदी गावात ऊस शेतीची तयारी केली आहे. डोंगराळ भागातील शेतकऱ्यांना नव्या आणि जादा शर्करायुक्त ऊसाची केपीबी ९६ ही प्रजाती देण्यात आली आहे. प्रभारी सहाय्यक ऊस आयुक्त कपिल मोहन यांनी सांगितले की, गेल्या वर्षी ऊसाचे लागवड क्षेत्र २४,५६७ हेक्टर होते. यावेळी ते नऊ टक्क्यांनी वाढून २६,७१४ हेक्टर झाले. चमोलीतही ऊस उत्पादनाची तयारी करण्यात आली आहे. खटीमा भागात ऊस क्षेत्र २२ टक्क्यांनी वाढले आहे, असे शेतकरी नेते प्रकाश तिवारी यांनी सांगतले. शेतकऱ्यांना ऊस बिले वेळेवर मिळत आहेत आणि कारखान्यांचे आधुनिकीकरण हे यामागील कारण आहे, असे ते म्हणाले.















