म्हैसूर : सत्तेवर असलेल्या पूर्वीच्या सरकारांनी म्हैसूर शुगर फॅक्टरी बंद करून शेतकऱ्यांचे जीवन दयनीय बनविले, असा आरोप कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला. मुख्यमंत्री कार्यालयाच्या (सीएमओ) अधिकृत निवेदनानुसार ते शुक्रवारी मद्दुर विभागात जन संकल्प यात्रेमध्ये उपस्थितांशी संवाद साधत होते. ते म्हणाले की, मंड्याच्या इतिहासात पाहिले तर येथे केवळ काँग्रेस आणि जनता दल (सेक्युलर)ची सत्ता होती.
म्हैसूर शुगर मील बंद झाल्यामुळे मंड्यातील शेतकऱ्यांना नाईलाजाने आपला ऊस गाळपासाठी म्हैसूरला न्यावा लागला. आधीच्या सरकारने शेतकऱ्यांचे जीवन समस्याग्रस्त बनवले. ते मुख्यमंत्री बनल्यानंतर म्हैसूर कारखाना पुन्हा सुरू करण्यात आला. ते म्हणाले की, जिल्ह्यात विजय मिळविणाऱ्या राजकीय पक्षांनी कधीच लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी काम केले नाही. मात्र, आताचे सरकार शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे.















