ढाका : बांगलादेशातील अनेक साखर कारखाने ऊस टंचाईचा सामना करीत आहेत. आणि याचा थेट परिणाम गाळपावर होत आहे. आता उसाच्या तुटवड्यामुळे दर्शन कैरव अँड कंपनीच्या साखर कारखान्याने शुक्रवारी सकाळपासून कामकाज बंद केले. कारखान्याने गेल्या ५३ दिवसांच्या कामकाजात ६२,००० मेट्रिक टन उसाचे गाळप करून ३,८८४ मेट्रिक टन साखर उत्पादन घेतले आहे.
गेल्या वर्षी २३ डिसेंबर रोजी साखर कारखान्याच्या गाळपास सुरुवात झाली होती आणि आता गाळप संपुष्टात आले आहे. कैरव अँड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) मुशर्रफ हुसेन यांनी सांगितले की, उसाचा पुरवठा आणखी १३ दिवसांपर्यंत उत्पादन सुरू ठेवण्यासाठी पुरेसा नव्हता. १९३८ मध्ये कारखान्याच्या स्थापानेनंतर पहिल्यांदाच प्राधिकरणाने अवघ्या ४२ दिवसांमध्ये गाळप बंद केले आहे. यापूर्वी १९ जानेवारी रोजी जॉयपूरहाट साखर कारखान्याने याच कारणामुळे, ऊस तुटवड्यमुळे आपले कामकाज बंद केले होते. कारखान्याच्या सूत्रानुसार, राज्याच्या या सर्वात मोठ्या कारखान्याला गेल्या हंगामात ६६.१७ कोटी टकाचे नुकसान झाले आहे.













