मुंबई : गेल्या वर्षी उच्चांकी साखर उत्पादनानंतर आता २०२२-२३ मध्ये महाराष्ट्रातील साखर उत्पादनात २३ % मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. ऊस उत्पादनातील घसरणीमुळे महाराष्ट्रातील साखर उत्पादन ३२ लाख टनांनी कमी होईल अशी शक्यता आहे. राज्यात गेल्या वर्षी १३८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. आजवरच्या इतिहासात हे उत्पादन सर्वाधिक होते. मात्र, २०२२-२३ मध्ये उत्पादन घटून १०६ लाख टनापर्यंतच होईल अशी अपेक्षा आहे.
राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी द टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, सतत आणि जादा पाऊस झाल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे. उसाचे लागवड क्षेत्र कमी झाले नसतानाही उत्पादन घटले आहे. उत्पादन १०७ टन प्रती हेक्टरवरुन घटून ८० टन प्रती हेक्टरवर आले आहे. राज्यात उसापासून इथेनॉलमध्ये रुपांतरणही १२ लाख टनावरुन वाढवून १७ लाख टन करण्यात आले आहे. आघाडीच्या साखर उत्पादक राज्यातील उत्पादनातही घसरण दिसून आली आहे. राष्ट्रीय स्तरावरील उत्पादनातही घसरण होणे शक्य आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने पावसामुळे गेल्या हंगामाच्या तुलनेत या हंगामातील साखर उत्पादनात घसरणीची शक्यता व्यक्त केली आहे.















