पुणे: महाराष्ट्रातील ऊस गळीत हंगाम समाप्त झाला आहे आणि या हंगामात साखर उत्पादनातही घट झाली आहे. साखर आयुक्त कार्यालयाकडील नव्या अहवालानुसार, चालू हंगामात २१० साखर कारखान्यांनी गाळप केले आहे. कारखान्यांनी १,०५४.७५ लाख टन उसाचे गाळप करुन १०५.२७ लाख टन साखर उत्पादन (२०२१-२२ मधील १२७.५३ लाख टनाच्या तुलनेत कमी) केले आहे.
या हंगामात सरासरी साखर उताऱ्यामध्येही घसरण दिसून आली आहे. या हंगामात राज्याचा सरासरी साखर उतारा ९.९८ टक्के राहिला. हंगाम २०२२-२३ मध्ये महाराष्ट्राचा साखर उतारा ०.४४ टक्क्यांनी घसरला आहे.
राज्यात सर्वाधिक साखर उतारा कोल्हापूर (११.४५ टक्के) विभागात नोंदविण्यात आला आहे तर सर्वात कमी साखर उतारा नागपूर विभागात (७.२० टक्के) नोंदवला गेला आहे.
साखर उत्पादनाच्या बाबतीत कोल्हापूर विभागाने २३.५४ लाख टन साखर उत्पादन करून आघाडी घेतली आहे. तर नागपूर विभाग सर्वात कमी ३.४८ लाख क्विंटल साखर उत्पादन करुन अंतिम स्थानी आहे. उपलब्ध अहवालानुसार, साखर उत्पादनातील घसरण ही मुख्यत्वे गेल्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर या काळात झालेल्या अवकाळी पावसामुळे झाली आहे.















