मुंबई : महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेड (MSEDCL) ने साखर कारखान्यांकडून उत्पादित केल्या जाणाऱ्या विजेसाठीच्या दरात कपात करून ते ₹४.७५ प्रती युनिट केले आहेत. त्यामुळे विज उत्पादनापासून मिळणारा महसूल घटल्याने राज्यातील अनेक कारखाने इथेनॉल उत्पादनासारख्या इतर महसुली पर्यायांकडे वळले आहेत.
हिंदूस्थान टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार, साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले की, अनेक साखर कारखाने आता आपली गरज पूर्ण करण्यासाठीच पुरेशा विजेचे उत्पादन करीत आहेत. जेव्हा महाविकास आघाडी (MVA) सरकार सत्तेवर होते, तेव्हा साखर कारखाने, साखर आयुक्त आणि MSEDCL ने एक बैठक घेतली होती. आणि अलिकडेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आणखी एक बैठक झाली. MSEDCL च्या म्हणण्यानुसार, जर त्यांना २ रुपये प्रती युनिट दराने सौर ऊर्जा मिळत आहे तर साखर कारखान्यांकडून जादा किमतीवर विज खरेदी करण्याची काहीच गरज नाही.
यापूर्वी MSEDCL या कारखान्यांडून ६.६० रुपये प्रती युनिट या दराने विज खरेदी करीत होते. मात्र, कारखान्यांना तेव्हाही पीक अवर्समध्ये खुल्या बाजारातील उच्च दरात विज मिळत होती. २००५ ते २००७ या काळात महाराष्ट्रात विजेच्या संकटादरम्यान, यापैकी बहुतांश कारखान्यांनी आपल्या महसुलासाठी पूरक म्हणून जवळपास ₹२,५०० कोटींच्या गुंतवणुकीसह सह-वीज उत्पादन प्लांट स्थापन केले. उप उत्पादनापासून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे कारखान्यांचा नफा वाढविण्यास मदत मिळाली, कारण ऊस आणि साखरेचा दर सरकारच्यावतीने नियंत्रित केला जातो. मात्र, जसजसे विजेचे उत्पादन वाढले, तसा MSEDCL ने साखर कारखान्यांना दिला जाणारा दर घटवून ४.७५ रुपये प्रती युनिट केला. त्यामुळे आता कारखान्यांना महसुलाच्या इतर पर्यायाकडे वळण्यास प्रोत्साहित केले आहे.
ज्या साखर कारखान्यांनी आधीच इतर महसुलाच्या पर्यायांकडे वळणे पसंत केले आहे, त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील आंबेगावच्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे. भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बोंडे म्हणाले की, पूर्वी आम्हाला MSEDCL ला विक्री केल्या जाणाऱ्या विजेसाठी ६.२० रुपये प्रती युनिट दर मिळत होता. मात्र, आता MSEDCL ने दर अशा प्रमाणात कमी केले आहेत की, आता बगॅस, विजेच्या तुलनेत अधिक दरावर विकला जातो. त्यामुळे कारखाने इतर पर्यायांकडे वळत आहेत.