ढाका : बांगलादेश सरकारने ऊस खरेदी दरात वाढ केल्याने पुन्हा एका ऊस शेतीला देशात प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून ऊस शेतीतून अपेक्षेनुसार नफा मिळत नसल्याने शेतकरी हळूहळू ऊस पिकापासून दूर जात आहेत. त्यामुळे देशांतर्गत ऊस आणि साखर उत्पादनात सातत्याने घसरण होत आहे. ही घसरण रोखण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.
बांगलादेश सांख्यिकी ब्युरोच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही वर्षात ऊस उत्पादनात मोठी घसरण झाली आहे. ही घसरण रोखण्यासाठी उद्योग मंत्रालयाने आर्थिक वर्ष २०२३-२४ हंगामापासून २२ टक्के जादा दराने ऊस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे पुढील वर्षी या दरात आणखी ९ टक्क्यांची वाढ केली जाणार आहे.
याबाबत द डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, बांगलादेश साखर आणि अन्न उद्योग महामंडळ (BSFIC) च्या वरिष्ठ सहाय्यक सचिव अफरोजा बेगम पारुल यांनी १० ऑगस्ट रोजी दर फेररचनेचा आदेश जारी केला होता. नवीन आदेशानुसार, जर शेतकऱ्यांनी कारखान्याच्या गेटवर ऊस आणल्यास प्रत्येक क्विंटल (१०० किलो) उसाची किंमत ५५० Tk (बांगलादेशी चलन) निश्चित करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या तोडणी हंगामापासून हा दर लागू आहे. यापूर्वी ही किंमत ४५० Tk होती.
कारखाना गेटपासून लांब खरेदीस Tk ४४० ते Tk ५४० असा दर निश्चित केला आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी अनुक्रमे Tk ६०० आणि Tk ५८७ अशी दरवाढ केली जाईल. बांगलादेश ऊस उत्पादक शेतकरी महासंघाचे सचिव शाजहान अली बादशा यांनी ‘द डेली स्टार’ ला सांगितले की, नव्या दरामुळे शेतकरी खुश आहेत. आणि देशात उत्पादन वाढेल.











