पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील वडनेर खुर्द येथील एका साखर कारखान्याला ऊसतोड कामगार पुरवण्याचे आमिष दाखवून तीन संशयित आरोपींनी कंत्राटदाराची २७ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी तिघांविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ईनवभारतमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, तालुक्यातील वडनेर खुर्द येथील सोमनाथ बोऱ्हाडे यांनी तक्रार दिली आहे. एका साखर कारखान्यासाठी ते ऊस तोडणीसाठी मजूर पुरवायचे. यावेळी त्यांची ओळख संशयित प्रभू उखा जाधव, गेंडे नामदेव चव्हाण आणि पिंटू रमेश कोळी यांच्याशी झाली. या तिघांनी बोऱ्हाडे यांच्यासोबत ऊस तोडणीसाठी मजूर उपलब्ध करून देण्याचा करार केला. त्यासाठी तिन्ही संशयितांनी बोऱ्हाडे यांच्याकडून २७ लाख रुपये घेतले.
त्यानंतर बोऱ्हाडे यांनी संशयितांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनेक दिवस उलटूनही ऊस तोडणीसाठी कामगार न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बोऱ्हाडे यांनी संशयित प्रभू जाधव, गेंडे चव्हाण व पिंटू कोळी (तिघेही, रा. हरसवाडी, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) यांच्याविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिन्ही आरोपींचा शोध सुरू आहे.













