जागतिक साखर उद्योगाचा धांडोळा घेणारी तिसरी आंतरराष्ट्रीय साखर परिषद यंदा १२ ते १४ जानेवारी २०२४ रोजी पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये (व्हीएसआय) होत आहे. या परिषदेत देश-विदेशांतील सुमारे दोन हजार प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या परिषदेसाठी मिडिया पार्टनर म्हणून ‘चीनीमंडी’ काम पाहणार आहे.
‘व्हीएसआय’चे अध्यक्ष शरद पवार यांच्या संकल्पनेतून साखर उद्योगासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची परिषद व प्रदर्शन भरविण्यास प्रारंभ झाला. ‘व्हीएसआय’तर्फे आयोजित यापूर्वीच्या दोन्ही साखर परिषदांन उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. आगामी साखर परिषदेच्या तयारीचा आढावा पवार यांनी घेतला. ‘व्हीएसआय’चे सल्लागार शिवाजीराव देशमुख यांच्यासह ‘व्हीएसआय’चे महासंचालक संभाजी कडू-पाटील यांनी परिषदेचे नियोजन सुरू केला आहे.
‘जागतिक साखर उद्योगातील शाश्वतता, आव्हाने व संधी’ या विषयावर होत असलेल्या या परिषदेच्या निमित्ताने व्हीएसआयच्या मांजरी फार्मवर एका भव्य प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. देश-विदेशातील शास्त्रज्ञ, तज्ज्ञ या परिषदेत साखर उद्योग व संलग्न क्षेत्रावर सादरीकरण करणार आहेत. परिषदेच्या निमित्ताने होत असलेल्या प्रदर्शनात जागतिक साखर उद्योगाच्या उभारणीतील सध्याची प्रगत उत्पादने, सेवा यांची माहिती मिळणार आहे. जगभरातील २०० पेक्षा जास्त सेवा पुरवठादारांना भेटण्याची संधी या परिषदेच्या निमित्ताने मिळणार आहे.












