कोल्हापूर : आसुर्ले – पोर्ले येथील दत्त – दालमिया भारत शुगर साखर कारखान्याच्या पोर्ले तर्फ ठाणे गट कार्यालयाला गुरुवारी सायंकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी टाळे ठोकले. कारखान्याने मागील तुटलेल्या उसाला ५० रुपयांचा हप्ता देणार असल्याचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयात दिले आहे. मात्र, चालू हंगामातील एफआरपी अधिक १०० रुपये उचल अद्यापही जाहीर केलेली नाही.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्याला इशारा म्हणून गट कार्यालयास टाळे ठोकून निषेध व्यक्त केला. दालमिया कारखान्याने चालू हंगामातील एफआरपी अधिक १०० रुपये पत्रात जाहीर केलेले नाही. आगामी दोन दिवसात एफआरपी अधिक १०० रुपये जाहीर न केल्यास आंदोलनाचा इशारा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला. यावेळी पन्हाळा तालुका युवाध्यक्ष विक्रम पाटील, रामराव चेचर, दगडू गुरवळ, बाबूराव चेचर, महादेव झेंडे, नारायण पाटील, धोंडिराम पाटील, बाळासाहेब खोत यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.












