कडेगाव : सोनहिरा कारखान्याने ऊस दरात नेहमी अग्रेसर स्थान राखले आहे. कारखान्याने शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे. कारखान्यास ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदाही चांगला दर दिला जाईल. लवकरच ऊस दर जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी दिली. कडेगाव येथे पत्रकारांशी ते बोलत होते. डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याने देशात सर्वोत्कृष्ट पुरस्कारासह राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार मिळविले आहेत. त्यामुळे ऊस दराबाबत सोनहिरा अग्रेसर असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुण्यनगरीमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, विश्वजित कदम म्हणाले की, सर्व कारखाने एफआरपीनुसार दर देतील. जिल्ह्यातील सहकारी व खाजगी कारखानदारांच्या बैठकीत ३१०० रुपये पहिली उचल देण्याचा निर्णय झाला आहे. ज्या कारखान्यांची क्षमता अधिक आहे, ते एफआरपीपेक्षा जास्त दर देतील. सध्या साखर कारखानदारीसमोर अनेक आव्हाने आहेत. या आव्हानांना सामोरे जाताना ऊस उत्पादक शेतकरी व संबंधित सर्व घटकांचे सहकार्य मिळणे गरजेचे आहे.











