कोल्हापूर : ऊस तोडणीवेळी मजुरांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात आहे. एकरी दोन हजारांपासून पाच हजार, तर गरजेनुसार त्याहीपेक्षा अधिक मागणी केली जात आहे. त्यामुळे ऊस पिकविण्यापेक्षा घालवणे खर्चिक आणि त्रासदायक ठरत आहे. यापूर्वी उसाला तोड आली की शेतकरी ऊसतोड करणाऱ्या मुकादमाला नारळ, उदबत्ती, साखर याबरोबरच खुशाली म्हणून शंभर ते दोनशे रुपये देत होते. मात्र, आता खुशालीचे स्वरुपच बदलले आहे. एकरी पैसे मागितले जात आहेत. ऊस मध्यम असेल तर उसाची भरती होत नाही म्हणून जादा रकमेची मागणी केली जात आहे. या प्रकारामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.
शिरोळ तालुक्यात छोट्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे ऊस तोडीसाठी मशीन फारसे उपयोगी पडत नाही. सद्यस्थितीत ऊसतोड मजूर कारखाना अधिकाऱ्यांना फारसे जुमानत नाहीत. शेतकरी ऊस तोडणी मजुरांच्या मागण्यांखाली दबून चालले आहेत. ऊसतोड मजुरांच्या खुशालीवर कोणाचेच अंकुश राहिले नाही. काही ठिकाणी प्रती टन १०० ते १७० रुपये मागितले जात आहेत. याशिवाय, वाहन चालकाला प्रत्येक खेपेसाठी २०० ते ३५० रुपये मागितले जात आहेत. मशीनने तोडणाऱ्या चालकाचाही ‘खुशाली’चा दर ठरला आहे. ‘खुशाली’ न दिल्यास उसाची नासधूस केली जात आहे.











