सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी २ एप्रिलअखेर एक कोटी ६२ लाख ६८ हजार ८२६ टन उसाचे गाळप करून एक कोटी ५३ लाख ६८ हजार ३८० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. जिल्ह्याचा साखर उतारा ९.४५ टक्के आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील यंदाचा साखर हंगाम अखेरच्या टप्प्यात आला असून, ३० साखर कारखान्यांचा हंगाम आटोपला आहे. एकूण ३५ पैकी सिद्धेश्वर, विठ्ठल (वेणूनगर), पांडुरंग, विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर व करकंब हे पाच कारखाने अजून सुरू आहेत.
जिल्ह्यातील १२ सहकारी साखर कारखान्यांनी ७६ लाख ३१ हजार ३६० टन उसाचे गाळप करून ९.८३ टक्के साखर उताऱ्याने ७५ लाख १९० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. तर २३ खासगी कारखान्यांनी ८६ लाख ३७ हजार ४६७ टन ऊस गाळप केले आहे. कार्यक्षेत्रातील ऊस संपत आल्याने गळीत हंगामाच्या समाप्तीचा वेगही वाढत आहे. आगामी काही दिवसांत सर्व साखर कारखान्यांचे गळीप संपु्ष्टात येईल, अशी शक्यता साखर उद्योगातील सूत्रांनी व्यक्त केली.















