पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने गेल्या १५६ दिवसांत कारखान्याने १४ लाख एक हजार टन गाळप करत १६ लाख ७२ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. कारखान्याने ११.९७ टक्के साखर उतारा राखत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. कारखान्याने ४ एप्रिल रोजी १४ लाख मे. टन ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण केला. यंदाचा हंगाम २० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यासाठी कारखान्याच्या प्रशासनाने नियोजन केले आहे. पाणीटंचाईचे सावट पाहता जिराईत भागातील ऊस गाळपास आणण्यास प्राधान्य देण्यात आले आहे.
कारखान्यालाही चालू वर्षी टंचाईच्या झळा बसल्या आहेत. कार्यक्षेत्रात केवळ ६० टक्के ऊस लागवड झाली आहे. गेल्या वर्षी कारखान्याकडे ४२ हजार एकरांची नोंद होती, तर चालू वर्षी २७ हजार एकरांची नोंद झाली आहे. सध्या बागायती भागात १० ते २० टक्के लागवड घटली आहे. पाणीटंचाईमुळे चालू वर्षी लागणीत घट झाली. कारखान्याकडे पुढील हंगामात ८ लाख टन ऊस उपलब्ध होईल. तर ४ ते ५ लाख टन ऊस गेटकेनचा आणावा लागणार आहे. त्यामुळे कारखान्याने १५ एप्रिलपर्यंत लागणीला मुदतवाढ दिली आहे.















