मेरठ : जिल्ह्यातील संपूर्ण उसाचे यावेळी ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) द्वारे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यामुळे ऊस सर्वेक्षणात कोणतीही चूक होणार नाही. जिल्ह्यातील साकोटी व किनौनी साखर कारखाना परिसरात जीपीएसवर आधारित सर्व्हेक्षण सुरू झाले असून उर्वरित कारखान्यांमध्ये १ मेपासून सर्वेक्षणाचे काम सुरू होणार आहे. लागण उसाचे सर्वेक्षण करून खोडवा उसाची पडताळणी केली जाणार आहे.
राज्याचा ऊस विभाग दरवर्षी कारखआना परिसरातील उसाचे क्षेत्र आणि उसाच्या प्रजाती शोधण्यासाठी सर्वेक्षण करते. यासाठी साखर कारखानदार आणि ऊस विभागाकडून संयुक्त ऊस सर्वेक्षण पथक तयार केले जाते. ऊस गाळप हंगाम २०२४-२५ साठी ऊस सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. ३० जूनपर्यंत उसाचे सर्वेक्षण पूर्ण करायचे आहे. याबाबत जिल्हा ऊस अधिकारी डॉ. दुष्यंत कुमार म्हणाले की, ऊस सर्वेक्षण पथकांना प्रशिक्षण देण्यात आले असून साहित्यसुद्धा उपलब्ध करून देण्यात आले आहे. किनौनी आणि साकोटी साखर कारखान्यांनी उसाचे सर्वेक्षण सुरू केले आहे. जिल्ह्यातील उर्वरित दौराला, मोहिउद्दीनपूर, मवाना, नंगलामल या कारखान्यांच्या परिसरातही १ मेपासून सर्वेक्षण सुरू होणार आहे. हे सर्वेक्षण जीपीएस सुसज्ज हँड ऑपरेटेड कॉम्प्युटर (एचएचसी) यंत्राद्वारे केले जाईल. उसाच्या क्षेत्राचे मोजमाप करून विभागीय सर्व्हरवर पाठवले जाईल.
जिल्ह्यातील २१५ सर्वेक्षण पथकांमार्फत डिजिटल ऊस सर्वेक्षण केले जाणार असल्याचे डीसीओ डॉ. दुष्यंत कुमार यांनी सांगितले. ऊस पिकाच्या क्षेत्राबरोबरच उसाच्या प्रजाती, उसाची स्थिती, पेरणीची पद्धत, पेरणीची वेळ इत्यादी तपशील रेकॉर्डमध्ये नोंदवले जातील.