नई दिल्ली : देशातील धान्य-आधारित इथेनॉल प्रकल्पांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ग्रेन इथेनॉल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (GEMA) देशात मका उत्पादन वाढवण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी “मका विकास” जनजागृती मोहीम सुरू केली आहे. केंद्र सरकारने देशातील मका उत्पादनावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे, ज्याचा उपयोग धान्य-आधारित इथेनॉल उत्पादनात फीडस्टॉक म्हणून केला जाईल.
असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, अन्नधान्यांपासून इथेनॉल तयार करण्याबाबत त्यांच्या ७० हून अधिक सदस्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. मोहिमेच्या प्रेरक साधनांपैकी एक म्हणजे डिजिटल सामग्री निर्मिती, यूट्यूब, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडिया चॅनेलवर टाकली जात आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून, सभासद कारखान्यांना वृत्तपत्रातील जाहिराती आणि बॅनर इत्यादी प्रसिद्ध करण्याची विनंती केली जात आहे.
GEMA च्या सहसचिव आरुषी जैन यांनी सांगितले की, असोसिएशनचे सदस्य असलेले कारखाने मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी चॅनल भागीदारांसोबत काम करतील. GEMA ने सदस्यांना बियाणे कंपन्यांच्या सहयोगाने काम करण्याचे आवाहन केले आहे, ज्यांना यामध्ये कौशल्य आहे. या मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी ते शेतकऱ्यांना सामावून घेतील आणि त्यांच्यासोबत काम करतील. जैन म्हणाल्या, गावोगावी ‘नुक्कड’ कार्यशाळेसारखे कार्यक्रम आखले जात आहेत. या मोहिमेत कृषिशास्त्रज्ञ, खत/कीटकनाशक कंपन्या, स्टोरेज आणि लॉजिस्टिक सेवा प्रदाते, व्यापार नेटवर्क आणि ग्राहक यांचा समावेश असेल.
त्यांनी सांगितले की, मका हा खरिपाच्या पिकातील एक भाग असून त्याची पेरणी दरवर्षी मे आणि जून महिन्यात केली जाते, त्यामुळे आता २०२४ च्या पेरणीच्या हंगामाकडे लक्ष वेधण्यासाठी प्रचार सुरू करण्यात आला आहे. ही मोहीम वर्षभर चालणार आहे. एकदा मक्याच्या उत्पादनात वाढ झाली की, या कार्यक्रमात उच्च उत्पन्न देणाऱ्या मक्याच्या जातींचे संशोधन आणि विकास समाविष्ट असेल. देशातील एकूण अन्नधान्य उत्पादनात मक्याचा वाटा फक्त १० टक्के आहे.
जनावरांसाठी दर्जेदार खाद्य असण्यासोबतच, स्टार्च, तेल, प्रथिने, अल्कोहोलयुक्त पेये, अन्न गोड करणारे, औषधी, कॉस्मेटिक, फिल्म, कापड, गोंद, पॅकेज आणि कागद उद्योग इत्यादींसह हजारो औद्योगिक उत्पादनांसाठी मका हा महत्त्वाचा कच्चा माल आहे. जैन यांनी सांगितले की, मक्का हे पावसावर अवलंबून असलेले पीक असून, लागवडीदरम्यान भूजलाची गरज कमी असते. हे एक अत्यावश्यक औद्योगिक पीकदेखील आहे, जे इथेनॉल उत्पादनासाठीदेखील एक स्रोत असेल. सध्या कमाल एमएसपीवर मका विकला जात असल्याने शेतकऱ्याला चांगला नफा मिळत आहे. अशा अनेक कारणांमुळे मक्याचे उत्पादन अनेक पटींनी वाढले पाहिजे, असे आम्हाला वाटते आणि म्हणूनच ही मोहीम राबवली जात आहे.