अहिल्यानगर : गेल्या वर्षी पाऊस नगण्य झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीपातळी खालावली आहे. उपलब्ध पाण्याचे स्त्रोत कोरडे पडले आहेत. त्यामुळे पाचव्या व सहाव्या महिन्यातील नवीन उसाची लागवड सोडाच, खोडवासुद्धा नांगरण्याची वेळ पाण्याअभावी शेतकऱ्यांवर आली आहे. यंदा उसाच्या क्षेत्रात कमालीची घट झाली आहे. चालू खरीप हंगामात कॉटन व सोयाबीन विक्रमी लागवड होण्याचे संकेत मिळत असून त्याखालोखाल चारा पिके व मक्याला प्राधान्य असल्याचा शेतकरी वर्गाचा अंदाज आहे.
सद्यस्थितीत परिसरात शेकडो हेक्टर क्षेत्र रिकामे झाले आहे. कडक उन्हाळ्याचा कृषी क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला आहे. इतर पिकांसोबत उसाच्या क्षेत्रालाही पाण्याचा तुटवडा जाणवला. कडक उन्हाने ऊस पिके तग धरू न शकल्याने पिके जळाली. येथील शेतकरी सुधीर वाघ यांनी सांगितले की, पाण्याअभावी आमच्यावर एक एकर खोडवा नांगरण्याची वेळ आली आहे. त्यामुळे किमान कमी कालावधीत होत असल्याने एक लाख रुपयांचे नुकसान झाले. बहुतांश शेतकऱ्यांना मे-जून मध्ये तोटा सहन करायची वेळ आली आहे. खरेतर शेतकरी या काळात उसाच्या लागवडीसाठी प्राधान्य देत असतात. मात्र चालू वर्षी कारखन्यांकडून झालेली सोयीस्कर ऊस तोडणी, पाणीटंचाईने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. पाण्याचे दुर्भिक्ष्य पाहता शिल्लक राहिलेल्या खोडव्यावरही नांगर फिरवावा लागला आहे.











