पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची रविवारी (ता.१६) ऑनलाइन बैठक घेतली.या बैठकीत बारामती येथे २२ व २३ जून रोजी राज्य कार्यकारणीची बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.या बैठकीत संघटनेची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे.शेट्टी यांच्यासह प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील व संदीप जगताप यांच्या नेतृत्वात विविध प्रश्नावर राज्यभर दौरे सुरू करणार आहेत.याशिवाय, विधानसभेसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, लातूर, नांदेड, परभणी, अमरावती, बुलढाणा, नाशिक, नंदुरबार या जिल्ह्यातील विविध विधानसभेच्या जागांबाबत सक्षम उमेदवारांची चाचपणी करण्याचे ठरवण्यात आले आहे. कार्यकारणीची बैठकीत ऊस दरासह विविध प्रश्नांचा होणार उहापोह होण्याची शक्यता आहे.
या बैठकीत स्वाभिमानीचे राजकारण वेगळ्या पध्दतीने करावे अशा पध्दतीची भूमिका शेट्टी यांनी मांडली. शेट्टी यांच्या या भूमिकेला राज्यातील सर्वच पदाधिकाऱ्यांनी एकमुखी पाठिंबा दिला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांसह शेट्टी यांचादेखील दारूण पराभव झाला. त्यावरून शेट्टी यांच्यासह कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती. आता शेट्टी यांनी पुन्हा शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरण्याचे ठरवले आहे. खासदारकी व आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट आपल्या डोक्यावर शोभून दिसतो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. राज्यभर विविध प्रश्नासाठी आंदोलने व मोर्चे चालूच ठेवा असा संदेश कार्यकर्त्यांना त्यांनी दिला आहे.











