सातारा : ऊसाच्या विक्रमी उत्पादनासाठी जिल्ह्यात दहा हजार हेक्टर क्षेत्रावर सुपर केन नर्सरी द्वारा ऊस लागवड करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले. फरांदे म्हणाल्या की, उसाच्या वाढत्या लागवडीकरिता तयार रोपांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने ऊस रोपांचा तुटवडा जाणवत आहे.यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात सुपर केन नर्सरी तयार करून उत्पादनात वाढ करावी.यासाठी कृषी विभाग तांत्रिक मार्गदर्शन आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून अतिरिक्त कर्ज पुरवठा केला जाणार आहे.निसराळे गावात शेतकऱ्यांनी 50 हेक्टर क्षेत्रावर सुपरकेन नर्सरी करून आदर्श निर्माण केला आहे.
या कार्यक्रमांमध्ये सुपरकेन नर्सरीचे जनक डॉ बाळकृष्ण जन्मदग्नी यांनी सुपरकेन नर्सरीच्या तांत्रिक बाबी विषयी मार्गदर्शन केले. नितीन जाधव यांनी ऊस उत्पादन वाढीमध्ये ठिबक सिंचनाचे महत्त्व विषद केले. विपुल मोरे यांनी शेतीमध्ये मजूर टंचाईवर उपाय यांत्रिक औजरांच्या वापराविषयी मार्गदर्शन केले. यावेळी प्रभारी तालुका कृषी अधिकारी युवराज काटे, विजय आगरे, नितीन पवार, अनिल यादव, रोहिदास तीटकारे, श्रीमंत घोरपडे, सुरेश घोरपडे, महेश घोरपडे आदिसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषी सहाय्यक अंकुश सोनावले यांनी सूत्रसंचालन केले. विकास सेवा सोसायटीचे चेअरमन राजेंद्र देशमुख यांनी आभार मानले.












