नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी दिली. पुढील आठवड्यात हे विधेयक संसदेत सादर केले जाण्याची शक्यता आहे. देशात ‘एक देश, एक निवडणूक’ हे धोरण राबविण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल केंद्रीय मंत्रिमंडळाने सप्टेंबर महिन्यात स्वीकारला होता. आज (दि. १२ डिसेंबर) केंद्रीय मंत्रिमंडळाने या विधेयकाला मंजुरी दिली आहे.
लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याचे विधेयक सरकारच्या अजेंड्यावर आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर हे विधेयक संसदेत मंजूर झाल्यास ‘एक देश, एक निवडणूक’ धोरण पुढील लोकसभा निवडणुकीवेळी, म्हणजे २०२९ मध्ये राबविले जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी संसदेत घटनादुरुस्तीद्वारे ही प्रक्रिया राबवावी लागेल. तसेच देशभरात व्यापक चर्चा करून सहमती निर्माण करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून केला जात आहे.


















