सातारा : जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या गाळप हंगाम उसाअभावी १५ मार्चअखेर संपण्याची शक्यता आहे. मागील वर्षी उसाची कमी झालेली लागवड तसेच कारखान्यांची वाढलेली संख्या यामुळे या गाळपास ऊस कमी पडत आहे. मात्र पुढील वर्षी परिस्थिती बदलणार आहे. जिल्ह्यात महाबळेश्वर तालुक्याचा अपवाद वगळता सर्वच तालुक्यांत ऊस लागवड झाली आहे. आडसाली, पूर्वहंगामी, सुरू हंगामात ७५ हजार ४५५ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड करण्यात आली आहे. खोडवा उसाचे क्षेत्र ३२ हजार हेक्टर असल्याने पुढील गाळप हंगामात तब्बल एक लाख सात हजार ८२५ हेक्टर क्षेत्रावर ऊस उपलब्ध होणार आहे.
अॅग्रोवनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, बहुतांश पाण्याची उपलब्धता वाढल्याने ऊस लागवडीकडे कल वाढला आहे. या वर्षी दमदार पाऊस झाल्याने उसाची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे. जिल्ह्याच्या पूर्वेकडील माण, खटाव, खंडाळा, कोरेगाव, फटलणच्या दुष्काळी भागात ऊस लागवड केली जात आहे. या परिसरात साखर कारखाने झाल्याने उसाचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. या हंगामात आतापर्यंत ३० हजार ८६४ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. तसेच आतापर्यंत ३२ हजार ३८० हेक्टर उसाचा खोडवा ठेवला आहे.












