नांदेड : हडसणी येथील श्री सुभाष शुगर प्रायव्हेट लिमिटेडने यंदा २८ मार्चपर्यंत तब्बल ५ लाख ७८ हजार टन उसाचे गाळप केले. कारखाना वेळेत सुरू झाला तर आठ लाख टन उसाचे गाळप करू शकेल, एवढा ऊस या भागात उपलब्ध असतो. परंतु, नजीकचे कारखाने या भागातील ऊस घुसखोरी करून पळवितात. कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी इतर कारखान्यांना ऊस न देता श्री सुभाष शुगर्सलाच ऊस देऊन ही संजीवनी जिवंत ठेवावी, असे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक सुशीलकुमार देशमुख यांनी केले.
कार्यकारी संचालक सुशीलकुमार देशमुख म्हणाले की, कारखान्याचे चेअरमन सुभाषराव देशमुख व जनरल मॅनेजर मानधना यांनी कार्यक्षेत्रात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस गाळपाचे नियोजन केले होते. दरवर्षी ऑक्टोबरच्या सुरवातीला कारखान्यांचे बॉयलर पेटतात. यावर्षी सुमारे वीस दिवस उशीर झाला. त्यामुळे जवळपास ५० हजार ते १ लाख टन ऊस गाळप करण्याचे गणित कोलमडले. यावर्षी कारखाने उशिरा सुरू करण्याच्या सरकारच्या आदेशामुळे गाळपावर निश्चितच फटका बसला. पुढीत वर्षी तसे होणार नाही याची काळजी घेऊ. कारखाना कार्यक्षेत्रात जवळपास आठ हजार हेक्टर म्हणजे वीस हजार एकर उसाचे क्षेत्र आहे. आगामी काळात उणिवा भरून काढून अधिकाधिक ऊस गाळप केले जाईल.











