पुणे : शेटफळगडे येथील बारामती ॲग्रोने यंदा सुमारे १६ लाख ९० हजार मे. टन ऊस गाळप करून राज्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे. आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील बारामती ॲग्रोने महाराष्ट्रात ऊस गाळपामध्ये २०२४-२५च्या हंगामातही आघाडी घेतली. तर ऊस गाळपामध्ये दुसरा क्रमांक जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याचा आहे. त्याने १६ लाख ७० हजार मे. टन गाळप केले आहे. तो सध्या भाडेतत्वावर असून, गुरू कमोडिटीज ही कंपनी चालवते.
पुणे जिल्ह्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा अपवाद वगळता, इतर सर्व म्हणजे १९९ साखर कारखान्यांचा हंगाम संपला आहे. विघ्नहर सहकारी लि., शिरोली, ता. जुन्नर हा एकमेव कारखाना सुरू आहे. त्याचा हंगाम मेच्या मध्यापर्यंत चालण्याची शक्यता आहे. राज्यात यंदाच्या हंगामात एकूण ऊस गाळप ८५२.३४ लाख मेट्रिक टन झाले असून एकूण साखर उत्पादन ८०७.६१ लाख क्विंटल झाला आहे. सरासरी ९.४८ टक्के साखर उतारा मिळाला आहे. यंदाच्या हंगामातील ऊस गाळप आणि साखर उत्पादन मागील हंगामापेक्षा कमी झाले आहे. तसेच, सरासरी साखर उतारादेखील मागील हंगामापेक्षा कमी आहे