जालना : कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना लि., युनिट नं. १ अंकुशनगर व युनिट नं. २ (सागर) तीर्थपुरीकडील गळीत हंगाम २०२५-२६ करिता ऊसतोड व वाहतूक कराराचा अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर प्रारंभ झाला. व्यवस्थापकीय संचालक बी.टी. पावसे म्हणाले की,गळीत हंगाम २०२५-२६ साठी कारखाना कार्यक्षेत्रात शेती विभागाच्या अहवालानुसार २४ ते २५ लाख मे.टन ऊस उपलब्धतेचा अंदाज आहे. या हंगामात कारखान्याचे युनिट नं. १ अंकुशनगरकडे १५ लाख व युनिट नं. २ (सागर) तीर्थपुरीकडे ७ लाख, असे एकूण २२ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
दैनंदिन गाळप क्षमतेनुसार पुरेशा उसाचा पुरवठा व्हावा,यासाठी ट्रक, डबल ट्रॉली ट्रॅक्टर,छोटे ट्रॅक्टर, टायर गाडी व हार्वेस्टर यंत्रणेशी ऊसतोड व वाहतुकीचा करार झाला. ऊसतोड वाहतुकीचे करार देताना अनुभवी, प्रामाणिक व हंगामाचे शेवटपर्यंत काम करणाऱ्या कंत्राटदारांना प्राधान्य देण्यात येईल. ट्रक किंवा ट्रॅक्टर टोळीमध्ये कराराप्रमाणे कोयत्यांची उपलब्धता, मजूर कामावर हजर करण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदारांची राहील. हार्वेस्टरच्या पाठीमागे हायड्रॉलिक ट्रॉलीची वाहने लावणे आवश्यक आहे. कारखाना व ऊसतोड वाहतूक यंत्रणेच्या परस्पर सहकायनि पुढील हंगाम यशस्वीरित्या पार पडावा, यासाठी सर्वांनी सांघिक प्रयत्न करावेत, असे आवाहन पावसे यांनी केले. कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक, कार्यकारी संचालक, केन मॅनेजर, चीफ अकाउंटंट, उप शेती अधिकारी, शेतकरी, ऊसतोड व वाहतूक कंत्राटदार उपस्थित होते.