धाराशिव : नॅचरल उद्योगाने नवनवीन व आधुनिक तंत्रज्ञान कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना मिळावे व त्यांच्या उत्पानामध्ये वाढ होऊन त्यांची आर्थिक उन्नती व्हावी, यासाठी कसोशीने प्रयत्न केलेला आहे. येत्या ऊस लागवड हंगामात नॅचरल शुगरच्या कार्यक्षेत्रातील किमान १ हजार शेतकरी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचे ऊस उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करतील, अशी माहिती नॅचरल उद्योग समूहाचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी दिली. नॅचरल उद्योग समूहाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘उसासाठी एआयचा वापर व उन्हाळ्यातील ऊस पीक संगोपन’ परिसंवाद व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. एआय तंत्रज्ञानाची मदत घेत ऊस उत्पादन वाढवणारा नॅचरल शुगर हा राज्यातील पहिला कारखाना असेल, असे ते म्हणाले.
शेतकरी मेळाव्यात डॉ. विवेक भोईटे, डॉ संजीव माने, प्रगतशील शेतकरी डॉ. बाळकृष्ण जडे यांनी मार्गदर्शन केले. ऊस पिकासाठी एआय (कृत्रिम बुध्दिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनामध्ये ३० टक्के पर्यंत वाढ व २५ टक्क्यांनी खर्च कमी होऊ शकतो असे ठोंबरे यांनी सांगितले. डॉ. संजीव माने यांनी उन्हाळयातील ऊस पीक संगोपन व एकरी १०० टन उत्पादन घेणेसाठीचे तंत्रज्ञान याची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली. डॉ. भोईटे यांनी एआय तंत्रज्ञानाविषयी शेतकऱ्यांना सखोल माहिती दिली. डॉ. जडे यांनी मका पिकाची माहिती दिली. कृषिभूषण पांडुरंग आवाड यांनी सूत्रसंचालन केले. किशोर डाळे यांनी आभार मानले.