पुणे : ऊस पिकाचा वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्याचे तज्ज्ञांचे आवाहन

पुणे : गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढला आहे. अशा परिस्थितीत ऊस पिकासह हळद, डाळिंब, चिकू, संत्रा, मोसंबी या पिकाचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. आवश्यकतेनुसार उसाला पाणी द्यावे, असा सल्ला परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे ग्रामीण कृषी मौसम सेवा मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. कैलास डाखोरे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

ॲग्रोवनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, डॉ. कैलास डाखोरे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी ऊस पिकास आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. खुरपणी करून तण नियंत्रण करावे. पिकावर खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास, व्यवस्थापनासाठी फवारणी प्रति लिटर पाणी, क्लोरपायरीफॉस (२० टक्के) २.५ मि.लि. किंवा क्लोरॲन्ट्रानिलिप्रोल (१८.५ टक्के) ०.४ मि.लि. अशी फवारणी करावी. जर उसावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास, व्यवस्थापनासाठी फवारणी प्रति लिटर पाणी, डायमिथोएट (३० टक्के) ३.६ मि.लि. अशा प्रमाणात फवारणी करणे गरजेचे आहे. अशाच प्रकारे हळद काढणी व नंतरच्या कामांमध्ये लक्ष द्यावे. सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे ही कामे सुरू आहेत. पावसाचा अंदाज पाहून हळदीची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. डाळिंब, चिकू फळबागांच्या वाढीची अवस्था तपासावी. कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे डाळिंब बागेत आवश्यकतेनुसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे. लहान फळ झाडांना काठीने आधार द्यावा असा सल्ला देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here