कोल्हापूर : वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई व संचालकांनी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची पुणे येथे भेट घेतली. कारखान्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रलंबित शासकीय देणी देण्यात सवलत मिळावी, अशी मागणी यावेळी त्यांच्याकडे करण्यात आली. कारखाना उभारणी काळात शासनाकडून मिळालेल्या तीन कोटी कर्जावरील देय राहिलेली व्याजाची रक्कम १२ कोटी १२ लाख रुपये कारखान्याच्या आर्थिक अडचणीमुळे भरणे शक्य नाही. ही रक्कम माफ व्हावी, अशी मागणी संचालकांनी केली.
याशिवाय, कारखान्याला शासकीय भाग भांडवलामधील परतफेड करण्याची ५ कोटी ९ लाख पाच वर्षांच्या विलंब कालावधीनंतर पुढे समान हप्त्यात भरण्याची सवलत मिळावी अशी आग्रही मागणी करण्यात आली. अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांनी सहकारमंत्री पाटील यांना प्रलंबित शासकीय देण्यांची सविस्तर माहिती दिली. सहकारमंत्री पाटील यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, अशी ग्वाही दिली. यावेळी साखर आयुक्त सिद्राम सालीमठ, संचालक उदयराज पवार, जिल्हा बँक प्रतिनिधी सुधीर देसाई, संचालक अनिल फडके, रणजित देसाई, कार्यकारी संचालक संभाजी सावंत, सचिव व्यंकटेश ज्योती उपस्थित होते.