अहिल्यानगर – ऊस, नारळाची शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्या : न्यायालयाचा वीज वितरण कंपनीला आदेश

अहिल्यानगर : वीज वितरण कंपनीच्या वीजवाहक तारांच्या शॉर्टसर्किटमुळे एक एकर ऊस व बांधाच्या कडेची सोळा नारळाची झाडे जळाली. त्यापोटी संबंधित शेतकरी अरविंद मालकर (रा. टाकळी, ता. कोपरगाव) यांना नऊ लाख ६४ हजार रुपयांची नुकसान भरपाई वीज वितरण कंपनीने द्यावी, असे आदेश कोपरगाव येथील दिवाणी न्यायाधीश एस. एस. बोस यांनी दिले.

शेतकऱ्यांची बाजू मांडताना ॲड. जयंत जोशी यांनी कृषितज्ज्ञ भीमराज भुजबळ यांची साक्ष नोंदविली. त्यांनी ऊस आणि नारळ पिकाबाबत केलेले लिखाण, त्यांचा याबाबतचा अनुभव आणि अभ्यास लक्षात घ्यावा. त्यांनी या नुकसान भरपाईच्या मूल्यांकनाबाबत दिलेला अहवाल ग्राह्य धरावा, असा युक्तिवाद केला. एकूण आठ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. वीज वितरण कंपनीचे अधिकारी भरपाई देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास आणून दिले.

मे २०१९ मध्ये मालकर यांचा ऊस विद्युत वाहक तारांच्या शार्टसर्किटमुळे जळाला होता. वीज वितरण कंपनीच्या इन्स्पेक्टरने या घटनेस वीज वितरण कंपनी जबाबदार असल्याचा अहवाल दिला होता. मात्र, भरपाई मिळत नसल्याने मालकर यांनी न्यायालयाचे दार ठोठावले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने वरील आदेश दिले. मालकर यांच्या बाजूने ॲड. स्मिता जोशी, ॲड. नितीन जोशी, ॲड. प्रियंका थोरात,ॲड. योगिनी निकम, ॲड. प्रशांत कोते, ॲड. संदीप उगले यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here