सांगली : कृष्णा सहकारी साखर कारखान्याने सन २०१० ते सन २०२० या काळात ऊसदरात फक्त ५०० रुपये वाढ केली आहे. या कारखान्याने उसाला प्रतिटन ५ हजार रुपये दर दिला पाहिजे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली. नेलें (ता. वाळवा) येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. हणमंतराव निकम प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत शेतकऱ्यांनी विविध प्रश्न मांडले.
रघुनाथदादा पाटील म्हणाले, कृष्णा कारखान्याच्या पाणी योजेच्या पाणीपट्टीचा दर २०२३ पासून एकरी पाच टन ऊस कपात असा राहिला आहे. ही ऊस कपात उत्पादक सभासदांवर अन्यायकारक आहे. पन्नास वर्षांपूर्वी सुरु झालेली योजना कालबाहा आहे. त्यामुळे पाणीपट्टी दर कमी करायला हवा. मृत सभासदांच्या वारसांची नोंद विनाअट विनातक्रार करायला हवी. आतापर्यंत थकीत राहिलेली मोफत साखर सभासदांना द्यावी. कारखाना प्रशासनाने लवकर या मागणींची दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी वाळवा तालुका अध्यक्ष लक्ष्मण पाटील, युवा आघाडीचे केतन जाधव, धनपाल माळी, जगन्नाथ माळी, विकास माने, बबनराव कदम, हणमंतराव कुंभार, किसनराव पाटील आदी उपस्थित होते.